व्यवहाराची किंमत

Guest post by Ashlesha Gore

मागील भागात आपण गमावलेल्या संधीची किंमत म्हणजे काय हे पाहिले.आता एका अशा किंमतीबद्दल आपण जाणून घेऊया जिच्याशी आपला रोजचा संबंध येऊनही आपण तिकडे दुर्लक्ष करतो.

समजा तुम्हाला एक टीव्ही सेट खरेदी करायचा आहे. तुमच्या जवळच्या दुकानात त्याची किंमत १०,०००/- रुपये आहे पण पेपरमध्ये एका सुपरस्टोरची १०% सवलतीच्या योजनेची जाहिरात आलेली आहे. ते ठिकाण तुमच्या घरापासून साधारण १० किमी लांब आहे. आता ह्यापैकी कोणता व्यवहार अधिक फायद्याचा ठरेल हा विचार तुम्ही करू लागता. फक्त दोन दुकानांमधल्या टीव्हीच्या किंमतीचा विचार केला तर सुपरस्टोर नक्कीच अधिक चांगला पर्याय आहे.

नीट विचार केल्यावर मात्र लक्षात येईल की हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. १० किमी दूर असलेल्या सुपरस्टोरला कारने जाण्यासाठी आणि तिथे गेल्यावर पार्किंगसाठी लागणारा खर्च विचारात घ्यावा लागेल. तसेच तिथे जाण्यायेण्यासाठी लागणारा वेळ विचारात घेऊन त्याची opportunity cost लक्षात घेतली तर कदाचित जवळच्या दुकानातून टीव्ही घेणे जास्त फायद्याचे ठरेल. ह्या उदाहरणावरून आपल्या असे लक्षात येते की कोणत्याही खरेदीची एकूण किंमत ठरवायची असेल तर त्याचे दोन भाग विचारात घ्यावे लागतील. एक – खरेदी केलेल्या वस्तूची किंमत आणि दोन – ही खरेदी करताना जी काही कृती करावी लागते त्याचा खर्च. ह्या दुसऱ्या भागालाच “व्यवहाराची किंमत” (transaction cost) असे म्हणतात.

कोणत्याही व्यवहाराचे तीन घटक असू शकतात:

१. हवी असलेली वस्तू बाजारात शोधणे – खरेदी करतानाची ही पहिली पायरी. हवी असलेली वस्तू आपल्या मनासारखी आणि ऐपतीत बसणारी हवी. ती तशी देऊ शकणाऱ्या दुकानाचा शोध घेणे हे ग्राहकाचे पहिले काम. इंटरनेटचा जमाना यायच्या आधी लोक वस्तूच्या किंमतीचा अंदाज घेण्यासाठी वेगवेगळ्या दुकानांमध्ये चकरा मारीत. तसेच योग्य गिऱ्हाईक मिळविण्यासाठी दुकानदारांना देखील पोस्टर, जाहिरात इत्यादीवर खर्च करावा लागत असे. अशाप्रकारे वस्तू आणि गिऱ्हाईक शोधण्याच्या कामात होणारा खर्च कोणत्याही व्यवहाराच्या किंमतीचा महत्त्वाचा भाग आहे.

२. घासाघीस करणे – वाटाघाटी करताना खर्च होणाऱ्या गोष्टीदेखील व्यवहाराच्या किंमतीत धराव्या लागतात. जर घासाघीस करणे त्रासदायक होत असेल तर ही किंमत इतकी वाढते की व्यवहार होणेच कठीण होऊन बसते. उदाहरणार्थ – काही रिक्षावाले मीटरप्रमाणे न जाता प्रत्येक ग्राहकाशी घासाघीस करीत बसतात. ही गोष्ट अनेक प्रवाशांना दिवसेंदिवस त्रासदायक वाटू लागते आणि त्यांच्यासाठी ह्या व्यवहाराची किंमत खूपच वाढते. त्यामुळे अनेक लोक रिक्षाने प्रवास न करता सरळ जास्त पैसे देऊन कॅबने जातात. म्हणजेच जेवढी जास्त घासाघीस तेवढी त्या व्यवहाराची किंमतही जास्त.

३. व्यवहार करताना ठरलेल्या अटी पाळणे – व्यवहार करताना ज्या अटी ठरलेल्या आहेत त्या पाळल्या जाणे हा त्या व्यवहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. जर त्या अटी पाळण्यासाठी मोजावी लागणारी किंमत जास्त असेल तर तो व्यवहार होऊ शकत नाही. उदाहरणार्थ – तुम्ही नवीन घेतलेल्या कपड्यांचा रंग पहिल्याच धुण्यात उतरला तर साहजिकच आपले नुकसान ताबडतोब भरून निघावे अशी तुमची अपेक्षा असेल. मात्र विकणाऱ्याने नुकसान भरून देण्यास खळखळ केली तर व्यवहार महागात जातो. म्हणून नेहेमी warranty चा उपयोग केला जातो. व्यवहार करतानाची किंमत कमीत कमी असेल हे ग्राहकाला पटवून देण्यासाठी warranty असते.

आता तुमच्या लक्षात येईल की इंटरनेटमुळे व्यवहाराची किंमत कशी कमी झाली आहे आणि हेच ऑनलाईन खरेदीच्या यशाचे गमक आहे.

व्यवहाराची किंमत आणि सरकारी धोरणे यांचा काय संबंध ?

कोणत्याही आर्थिक प्रक्रियेबरोबर transaction cost चा बोजा येतोच. खरेदी करणारा आणि विकणारा दोघांनाही ही किंमत चुकवावी लागते. व्यवहाराची किंमत जेवढी जास्त असते तेवढी ती व्यवहार करण्यासाठी मारक ठरते. ती खूप जास्त वाढली की आर्थिक विकासात अडथळा येतो.

उदाहरणार्थ सार्वजनिक वितरण प्रणाली (public distribution system) बघूया. अनेकवेळा ह्या योजनेचा फायदा गरीब माणसाला मिळतच नाही. ह्याचे कारण भ्रष्टाचार नसून खूप जास्त असलेली व्यवहाराची किंमत हे आहे. लांबवरून PDS च्या दुकानापर्यंत येण्याचा खर्च, अर्धा-एक दिवस रांगेत घालवल्यामुळे तेवढ्या वेळाच्या गमावलेल्या पगाराची किंमत आणि गुणवत्तेची खात्री नसल्याने त्यासाठी द्यावी लागू शकेल अशी सर्वात मोठी किंमत ह्या सगळ्याचा विचार करता बहुतेक लोक खुल्या बाजारातून वस्तू विकत घेणेच इष्ट समजतात.

म्हणून ज्या धोरणामध्ये खरेदी करणाऱ्यास आणि विकणाऱ्यास कमीत कमी व्यवहाराची किंमत द्यावी लागते तेच धोरण उत्तम म्हणता येईल.

Ashlesha Gore handles her family retail cloth store in Pune. She is interested in languages and blogs at ashuwaach.blogspot.in andsanskritsubhashite.blogspot.in in Marathi and Marathi-Sanskrit