धन्यवाद, ग्लाड महोदय!

दर वर्षी ३० सप्टेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय अनुवाद दिवस’ म्हणून साजरा केला जातो. अनुवाद ही खरे तर मूळ लेखनाइतकीच सर्जनशील कृती असते. चांगले अनुवादक हे दोन भाषांमध्ये आणि परिणामी दोन समाजांमध्ये पूल बांधण्याचे, सहकार्याच्या कक्षा रुंदावण्याचे व संवाद साधण्याचे काम करत असतात. अनुवादामुळेच उत्तमोत्तम साहित्यकृती भाषा-प्रदेश-संस्कृती-राष्ट्र-काळ यांनी घातलेल्या मर्यादांच्या पलीकडे पोहोचतात. अनुवादित साहित्याचा प्रभाव एखाद्या समाजावर कशा प्रकारे आणि कधी पडू शकेल, याची मूळ लेखकालाही कल्पना येऊ शकणार नाही. अनिल बर्वे यांच्या ‘थँक यू मिस्टर ग्लाड’ या मराठी कादंबरीबाबत असेच म्हणता येऊ शकेल.

‘डोंगर म्हातारा झाला’, ‘अकरा कोटी गॅलन पाणी’, ‘थँक यू मिस्टर ग्लाड’, ‘स्टडफार्म’ आणि ‘आतंक’ अशा कादंबऱ्या, ‘चर्मणावती चंबळ’, तिसरा डोळा’ यांसारख्या रहस्यकथा आणि ‘हमीदाबाईची कोठी’, ‘पुत्रकामेष्टी’ यांसारखी आठ नाटके याद्वारे मराठी साहित्यावर ठसा उमटवणाऱ्या लेखकांमध्ये अनिल बर्वे (जन्म : १९४८, मृत्यू : १९८४) यांचा समावेश होतो. साधारणत: १९७४ ते १९८४ हे दशक इतकाच बर्वे यांचा साहित्यिक कालखंड आहे. सर्वार्थाने राजकीय-सामाजिक अस्वस्थतेचा व लोकशाही व्यवस्थेला आव्हाने निर्माण होण्याचा असा हा काळ आहे. आर्थिक नियंत्रणे, महागाई, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई असलेल्या लायसन्स-कोटा-परमिटराजच्या त्या काळात सिनेमात खाणमालक, कारखानदार, जमीनदार अशा श्रीमंत वर्गाविरोधी भूमिका घेणारा व कृती करणारा अमिताभ बच्चनचा ‘अँग्री यंग मॅन’ लोकप्रिय झाला होता. बर्वे यांचे लेखन वाचतानासुद्धा वाचकांच्या मनात नकळतपणे प्रस्थापित व्यवस्था, श्रीमंत व्यक्ती, व्यापारी अशा ‘शोषक’ वर्गाविरोधी भावना तीव्र होत जातात; तर व्यवस्थाविरोधी लढा देणारे, श्रीमंतांचा गर्व उतरवणारे, नक्षलवादी यांच्याविषयी आपसूकपणेच सहानुभूती दाटून येते. कम्युनिस्ट विचारसरणीशी बांधिलकी असूनही आपल्या लेखनाला प्रचारी न करणाऱ्या बर्वे यांची ‘थँक यू मिस्टर ग्लाड’ ही कादंबरी मराठी भाषेतून अनुवादित झाली आणि नेपाळ, श्रीलंका व भूतान या भारताच्या शेजारी देशांवर प्रभाव पाडून गेली.

१९६७ साली पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेल्या नक्षलवादी चळवळीने अनेक बुद्धिमान तरुणांना आकर्षित केले होते. त्याच चळवळीचा संदर्भ घेऊन लिहिलेली ‘थँक यू मिस्टर ग्लाड’ ही बर्वेची पहिली कादंबरी. १९७५ साली आणीबाणी लागू केल्यानंतर ‘माणूस’ साप्ताहिकाच्या दोन अंकांत ही कादंबरी प्रकाशित झाली होती. ग्लाड नावाच्या एका ब्रिटिश जेलरच्या तुरुंगात फाशीची शिक्षा झालेला वीरभूषण पटनाईक नावाचा, शिक्षणाने डॉक्टर असलेला एक तरुण, तडफदार नक्षलवादी येतो. आयुष्यातले शेवटचे काही दिवस राजमहेंद्री तुरुंगात कंठणाऱ्या या नक्षलवाद्याचा आत्मविश्वासपूर्ण वावर आणि उमद्या वर्तनामुळे कर्तव्यकठोर, क्रूर आणि निर्दयी ग्लाडसाहेबाच्या मनोवृत्तीत होत गेलेले बदल असे कथानक असलेली ही केवळ ९२ पानांची कादंबरी. ग्लाडसाहेबाच्या एकुलत्या एका मुलीची अतिशय गुंतागुंतीची प्रसूती पार पाडणाऱ्या वीरभूषण पटनाईकला त्याच दिवशी फाशी देण्यासाठी नेले जाणार असते. मात्र, एखाद्या सामान्य गुन्हेगाराला देतात तशा प्रकारे फाशी न देता ग्लाडसाहेब उलट त्याच्या छातीवर गोळी घालून त्या ‘कॉम्रेड’ला वीरमरण देतो आणि वीरभूषण पटनाईक ‘थँक यू, मिस्टर ग्लाड!’ असे म्हणत प्राण सोडतो. प्रत्येक पिढीतील संवेदनशील वाचकांच्या मनावर विलक्षण गारूड करणारी, एकाच वेळी बुद्धीला व भावनेला हात घालणारी आणि पुन:पुन्हा वाचायला आवडेल अशी ही प्रभावी कादंबरी. आज या कादंबरीतले संदर्भ बदललेले असले आणि नक्षलवादाचा राष्ट्रीय सुरक्षेला किती धोका आहे हे पुरेसे स्पष्ट झालेले असले, तरी आजसुद्धा ही कादंबरी अजिबातच कालबाह्य़ वाटत नाही.

या कादंबरीचे गुजराती, हिंदी अशा भाषांत अनुवादही झाले आहेत. अर्थात, कादंबरी प्रकाशित होऊन ४४ वर्षे झाली असली तरी अजूनही तिचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झालेला नाही. मात्र इंग्रजी अनुवाद झाला नसला, तरीही भारताच्या शेजारी देशांमध्ये ही कादंबरी किंवा त्यावर आधारित नाटक कोणत्या ना कोणत्या मार्गाने पोहोचलेले आहे. गेल्याच वर्षी, एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध श्रीलंकन नाटककार के. समन तुषार यांनी श्रीलंकेच्या नाटय़वर्तुळातील आघाडीच्या कलाकारांना सोबत घेऊन या कादंबरीवर आधारित नाटकाचे ‘सेरादा सहोदरा’ (इंग्रजी अर्थ : कॉम्रेड ब्रदर) या नावाने प्रयोग केले होते. श्रीलंकेतील प्रस्थापित शक्तींना, आक्रमक बुद्धिस्ट-सिंहली राष्ट्रवादाला विरोध करणाऱ्या डाव्या प्रवाहाला, संवेदनशील कलावंतांना हे नाटक जवळचे वाटल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. श्रीलंकेच्या सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली केलेले अत्याचार आणि विरोधी आवाज दडपण्याचे जे प्रयत्न केले आहेत, ते पाहता हे नाटक करणे हीच एक मोठी सरकारविरोधी कृती आहे.

मात्र, या कथानकाचा श्रीलंकेपेक्षाही अधिक प्रभाव नेपाळमध्ये पडला आहे. ही कादंबरी बहुधा हिंदी अनुवादामुळे नेपाळी कलावंतांपर्यंत पोहोचली असावी. कारण मूळ कादंबरी प्रकाशित झाल्यानंतरच्या फक्त सातच वर्षांत- १९८२ साली नेपाळमध्ये या कादंबरीवर आधारित नाटक ‘उसको कबितामा आबा को रुदैना’ (मराठी अर्थ : त्याची कविता ऐकून कोण रडणार नाही?) या नावाने तयार केले गेले होते. नेपाळी भाषेतील १,२०० हून अधिक टीव्ही मालिका आणि ६० पेक्षा अधिक सिनेमांत अभिनय केलेल्या रमेश बुधाटोकी या प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारकीर्दीची सुरुवातच या नाटकापासून झाली होती. तेव्हा राजेशाही शासन असलेल्या नेपाळच्या काठमांडू, भद्रपूर या महत्त्वाच्या शहरांत या नाटकाचे प्रयोग झाले होते. यापकी भद्रपूरमधील प्रयोगाच्या वेळेस सरकारी अधिकाऱ्यांनी या नाटकाला ‘सेन्सॉर’ केले आणि मगच प्रयोग होऊ दिला होता.

तिसऱ्या जगातील मागासलेल्या देशांत जुलमी राज्यकर्त्यांच्या विरोधात लढा देणारे, लोकशाहीची मागणी करणारे गट डाव्या विचारसरणीने प्रभावित झालेले असतात, असे आपल्याला अनेकदा पाहायला मिळालेले आहे. अन्याय करणारी प्रस्थापित सामाजिक-राजकीय व्यवस्था उलथून टाकून नवी ‘न्याय्य’ व्यवस्था प्रस्थापित करावी याचे आकर्षण तरुणाईला नेहमीच असते. नेपाळही याला अपवाद नव्हता. राजेशाही शासन, मागासलेली समाजव्यवस्था असलेल्या व स्वत:ला ‘हिंदुराष्ट्र’ म्हणवणाऱ्या नेपाळच्या तेव्हाच्या प्रतिगामी राजकीय-सामाजिक परिस्थितीत ‘लोकशाही’, ‘स्वातंत्र्य’ अशा क्रांतिकारी विचारांचा प्रचार या नाटकातून होई.

बुधाटोकी यांच्या गटाने हे नाटक नेपाळप्रमाणेच हिमालयाच्या कुशीत वसलेल्या व राजेशाही व्यवस्थाच असलेल्या भूतान या देशातही नेले होते. मात्र, हे नाटक तेथील राजाच्या विरोधी आहे असे वाटल्याने एका प्रयोगानंतरच या गटाला आपली अटक टाळण्यासाठी भूतान सोडायची वेळ आली होती. त्यानंतर पुढे १४ वर्षांनी, म्हणजे १९९५-९६ मध्ये या कादंबरीवर आधारित ‘बलिदान’ नावाचा एक सिनेमा तुलसी घिमिरे या यशस्वी दिग्दर्शकाने नेपाळी भाषेत बनवला. नेपाळसारख्या देशात सिनेमातून असे कथानक मांडणे याचे काय परिणाम होऊ शकतात, याची कल्पना असूनही असा सिनेमा तयार केला गेला. यावरून या कादंबरीचे ‘अपील’ काय असेल, याची कल्पना करता येऊ शकते. पावणेतीन तासांचा हा सिनेमा आज यूटय़ूबवर पाहण्यास उपलब्ध आहे. या सिनेमावर २००५ मध्ये बंदी घातली गेली होती. मात्र, नेपाळमध्ये जी राजेशाहीविरोधी जनआंदोलने झाली, त्यात या सिनेमातील एक गाणे फारच लोकप्रिय झाले होते.

नेपाळमध्ये ‘थँक यू मिस्टर ग्लाड’ या कादंबरीचे ‘अपील’ समजून घेणे कठीण नाही. नक्षलवादाची सुरुवात झाली त्या बंगालमधील नक्षलबारीच्या प्रदेशापासून नेपाळ आणि भूतान हे दोन्ही देश फारच जवळ आहेत. तसेच उत्तरेला आक्रमक, कम्युनिस्ट चीन आणि दुसरीकडे पश्चिम बंगालचे कम्युनिस्ट राज्य सरकार असा शेजार या देशांना होता. सरंजामी व कर्मठ व्यवस्था असलेल्या नेपाळ व भूतान या देशांना राजेशाहीविरोधी विचार प्रसृत होणे, लोकशाही, स्वातंत्र्य यांसारख्या मूल्यांचा प्रचार होणे नको होते. त्यामुळे या देशांत अशा ‘धोकादायक’ नाटकांवर व डाव्या विचारांचे काम करणाऱ्या गटांवर बंधने होती. असे असले तरीही नेपाळच्या राजकारणामध्ये डाव्या विचारांचा प्रभाव १९८० नंतर क्रमाने वाढतच गेला. पुढे १९९६ ते २००६ अशी दहा वर्षे नेपाळ राजेशाही शासन विरुद्ध माओवादी गट अशा यादवी युद्धात सापडला. या युद्धात १६ हजारांहून अधिक लोक मारले गेले. हजारो लोकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली.

यादवी युद्धाच्या काळात सरकारी फौजांशी लढणाऱ्या माओवादी सनिकांपकी अनेकांनी तुरुंगात असताना ‘थँक यू मिस्टर ग्लाड’ नेपाळी भाषेत वाचली होती. या कादंबरीला प्रज्वल श्रेष्ठ यांनी १९९८-९९ मध्ये नेपाळी भाषेत ‘धन्यवाद, ग्लाड महोदय’ या नावाने अनुवादित करून प्रसिद्ध केले होते. (नेपाळमध्ये अनुवादित कम्युनिस्ट पुस्तकांचा व मॅक्झिम गॉर्कीच्या ‘आई’सारख्या कादंबऱ्यांचा खूपच प्रभाव होता.) या सनिकांपकी काही जणांनी असे नोंदवले आहे की, तुरुंगात असताना जेव्हा जेव्हा त्यांचा छळ होत असे, तेव्हा या कादंबरीने त्यांचे मनोधर्य टिकवून ठेवले होते. अशा या पोलिसी छळापेक्षा आपल्यालाही ‘वीरभूषण पटनाईक’सारखे मरण यावे असे त्यांना वाटत असे. एका मराठी साहित्यिकाच्या अनुवादित कादंबरीने शेजारी देशातील, मुख्यत: ग्रामीण भागातून आलेल्या अशिक्षित/अर्धशिक्षित सनिकांच्या मनोवृत्तीवर असा प्रभाव टाकला होता, हा किती विलक्षण ‘फेनॉमेनॉ’ आहे!

अर्थात, यात जितका वाटा बर्वेच्या लेखनाचा होता, तितकाच त्यांच्या कादंबरीचा अनुवाद करणाऱ्यांचाही होता. या कादंबरीचा नेपाळी समाजावरील प्रभाव पाहता, चांगल्या साहित्याची व त्याच्या अनुवादाची ताकद ध्यानात येऊ शकते.

हा लेख लोकसत्ता या मराठी दैनिकात प्रसिद्ध झाला होता.